कुंभोज (प्रतिनिधी) : हिंगणगाव, ता. हातकणंगले येथील समता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व माळवाडीमधील नागरिक यांच्या वतीने सार्वजनिक शौचालय दुरवस्था, गटारीचे सांडपाणी शिरल्यामुळे क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. या शौचालय व क्रीडांगणाची त्वरित दुरवस्था थांबवावी, या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, क्रीडांगणालगत असलेल्या तिन्ही गल्लीमधील सांडपाणी हे क्रीडांगणावर पसरत असून, या पाण्याची कोणतेही नियोजन नसल्यामुळे दलदल व डासांचे साम्राज्य निर्माण झाले  आहे. डेंग्यूसह इतर रोगांना क्रीडांगणालगत असणाऱ्या गल्लीतील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे

सध्या क्रीडांगणावर कुठेही केरकचरा टाकला जात आहे. माजी सरपंच विलास कांबळे यांनी क्रीडांगण केल्यानंतर उकिरड्यांना एक वेगळे प्रकरे शिस्त लावली होती. त्या पद्धतीने शिस्त लावून क्रीडांगण दुरवस्थामुक्त करावे. क्रीडांगणा लगतच १० शौचालये असून, या शौचालयांची संरक्षक भिंत, दारे व पाण्याची सुविधा नसल्यामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडांगण व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, गटारीचे सांडपाणी हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी समता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व माळावरील नागरिकांनी केली आहे.

वैभव बेळवंकी, राहुल रत्नपारखे, प्रीतम नरंदे, संतोष नाडे, मिरासो नायकवडे, संजय कदम, अभिजित कोळी, अभिजित तेरदाळे, विजय हदीमाने, महेश पवार, सूरज रत्नपारखे, ललिता आरकडे, संदीप कांबळे, सूरज रत्नपारखे यांच्या उपस्थितीत हे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले.