कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवजयंतीनिमित्त रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या रोषणाईवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, असा शब्दांत संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगीबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून. या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.