कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या आजच्या आठव्या दिवशी श्री अंबामातेची महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपात आकर्षक पुजा बांधण्यात आली. दैत्य रंभासुर व महिषी यांच्या मिलनातून महिषासुराचा जन्म झाला होता. तो ब्रम्हाचा भक्त होता. घोर तपश्चर्येतुन त्याने ब्रम्हदेवाकडून मानव, देव, दानव यांच्याकडून अपराजित राहण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाने तो उन्मत्त झाला होता.

महिषासुराने देवदेवतांना हैराण करुन सोडले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व देवांनी ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्याकडे धाव घेतली आणि महिषासुरापासुन सुटका करण्याची विनंती केली. तेंव्हा या त्रिमुर्तींनीनी आपल्या क्रोधातुन एक तेज शक्ति प्रकट केली. ती साक्षात दुर्गा देवीच होती. तिला सर्व देव देवतांनी अस्त्र-शस्रे दिली. देवी दुर्गेने महिषासुराला आव्हान देउन दैत्यसेनेबरोबर युद्ध पुकारले. आणि हे युद्ध आठ रात्री सुरु होते. अखेर अष्टमीच्या रात्री दुर्गेने महिषासुराचा वध केला.

ही पूजा श्रीपूजक सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, मयुर मुनिश्वर यांनी बांधली.