कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू :  ना. सुभाष देसाई

0
38

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा हा मुंबई, पुणे जिल्ह्यानंतर औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. परंतु, या औद्योगिक वसाहतीना आजही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे अत्यावश्यक असल्याने याप्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावेमागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांची भेट घेतली.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असल्याने जिल्ह्याची उद्योगांच्या बाबत स्पर्धा सुरु आहे. जिल्ह्यामध्ये उत्पादित वैशिष्ट्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्यात जगातील विविध बाजारपेठांमध्ये व्हावी. तसेच जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांची माहिती उद्योजकांना सुलभ रीतीने होण्यासाठी जिल्ह्यात कायमस्वरूपी निर्यात सुविधा केंद्राची स्थापना करण्यात यावी. यासह उत्पादित माल अल्पावधीत जगभरातील बाजारपेठेत पोहचविण्यासाठी विमानसेवेचा विस्तार व नाईट लँडिंगची सेवा लवकरात लवकर सुरु होणेबाबत प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली.

तसेच उद्योगांच्या विस्तारासाठी, नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात किमान आणखी दोन औद्योगिक वसाहतींची निर्मिती करावी. राज्यात इतर औद्योगिक जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास महाविद्यालय, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात यावी. वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत वाजवी राहतील व किमान ३ वर्षे स्थिर राहतील, असे धोरण आखण्यात यावे. कामगारांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात. आदी मागण्या राजेश क्षीरसागर यांनी केल्या. यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली.

यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, राज्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासात कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे सांगत या प्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतही आश्वासित केले.