कोल्हापूर, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे महापुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन उपाययोजना राबविण्यासाठीचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पालकमंत्री यांनी आज (शनिवार) करवीर तालुक्यातील पूरबाधित गावांना भेटी दिल्या. यानंतर हातकणंगले तालुक्यातील रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, मुरलीधर जाधव, तहसीलदार शरद पाटील, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी बैठक घेऊन ठोस उपाययोजनांबाबत चर्चा करुन कृती आराखडा तयार केला जाईल. यात ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार केला जाईल. रुई-इंगळी बंधाऱ्याबरोबरच नदी, ओढ्यावरील भरावामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजना करणे, ओढ्यावरील व नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, गाळ व राडारोडा काढणे, गावांचे पुनर्वसन करणे, पुररेषा निश्चित करुन नद्यांचे रुंदीकरण आदी उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.