स्पर्धेत टिकणारे सक्षम विद्यार्थी घडवणार : नवोदिता घाटगे

0
40

कागल (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धेच्या युगात टिकणारे सक्षम विद्यार्थी घडवण्यात येतील, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.

दि कागल सिनियर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुरगूड व श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीच्या वतीने येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या.

दहावीमध्ये कागल तालुक्यात प्रथम आलेल्या बिद्री येथील भारतमाता हायस्कूलचा विद्यार्थी सोहम देसाई व मुगळी हायस्कूलची साक्षी कुणकेकर हे ९७.७ टक्के गुण मिळवल्याबद्दल दोघांना राजे विक्रमसिंह घाटगे पुरस्काराने, तर बारावीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आशीष खोत यास कर्नल दिलीपसिंह मंडलिक पुरस्कार देऊन गौरवले. यावेळी अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला.

घाटगे पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बौद्धिक शारीरिक शैक्षणिक व मानसिक तयारी करून घेण्यासाठी विक्रमसिंह घाटगे अकॅडमीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे.

श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या की, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्या सोबतच पालकांनीही दक्ष असायला हवे. आपले ध्येय निश्चित करून योग्य मार्गाने प्रयत्न करायला हवा. यावेळी टी.एन.सी. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. टी. एन. चव्हाण यांनी राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमीबद्दल माहिती दिली. कर्नल दिलीपसिंह मंडलिक यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी टी. जी. आवटे, युवराज पसारे,  प्रशासन अधिकारी कर्नल एम. व्ही. वेस्वीकर,  प्राथमिकच्या मुख्याध्यापिका जे. व्ही. चव्हाण, मुख्याध्यापक एस. डी. खोत, सौ. एस. एस. पोवार, प्रगती घाटगे आदी उपस्थित होते.