राशिवडे (प्रतिनिधी) : बऱ्याच वेळा सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटना पाहावयास मिळतात; परंतु राशिवडे बुद्रुक येथील एका घटनेत सासरकडील नातलगांच्या त्रासास कंटाळून चक्क एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. संग्राम मधुकर कांबळे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

कौटुंबिक कलह, पत्नी, सासू-सासरे व सासरकडील नातेवाइकांच्या त्रासास कंटाळून या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओद्वारे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. शिवाय केलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती देऊन आणि आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या नातेवाइकांची नावे सर्वांसमोर स्पष्ट करून तो व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवला. विशेष म्हणजे स्वतःच्या व्हॉट्सअपला भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस लावून त्याने आत्महत्या केली. या व्हिडीओद्वारे संग्रामने पत्नी, सासू-सासरे आणि जबाबदार नातेवाइकांना कडक शिक्षा करण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे. तसेच आपल्या या कृत्याबद्दल संग्रामने क्षमाही मागितली आहे. मनमिळाऊ संग्रामच्या अशा अकाली एक्झिटमुळे आई-वडील, मित्रांसह सर्वच सुन्न झाले आहेत. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.