कोल्हापुरातील कोव्हिड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्यांवर उपासमारीची वेळ : सणाला तरी बिले मिळणार का..?

0
151

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन सर्व पातळ्यांवर तयारी करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोवीड सेंटरची बीले थकीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ठेकेदार कोरोना सेंटर चालवण्यास तयार होतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोव्हिड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्यांची बीले अजून थकीत आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही चार महिने झाले तरी त्यांना हक्काचे पैसे मिळत नाहीत ही शरमेची बाब आहे.

करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात जीव उधार होऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना सेंटरमध्ये काम केलेल्या कोरोना योद्धांना गेल्या चार महिन्यापासून एक दमडीही मिळालेली नाही. तर सेंटरमधील चहा, नाश्ता, जेवण, पाणी पुरवणाऱ्यांसह साफसफाई करणाऱ्यांची लाखो रुपयांची बीले थकीत आहेत. सेंटर चालवणाऱ्या कंत्राटदारांनी लाखोंची पदरमोड करून रुग्णांना सेवा देण्याचे काम केले. परंतु त्यांच्यावरच आता उपासमारीची वेळ आली आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिकारी वर्ग चालढकल करत या कोर्टातून त्या कोर्टात चेंडू ढकलत जबाबदारी झटकत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सणाच्या तोंडावर  कोरोना सेंटरची थकीत बील मिळणार काय ? असा प्रश्न जिल्ह्यातून जोर धरू लागला आहे. याप्रकरणी ‘लाईव्ह मराठी’ ने आवाज उठवला असता याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत सेंटरची बीले काढण्यासाठी जिल्हा खनिकर्ममधून निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, याची पुढील कार्यवाही होऊन प्रत्यक्षात बील कधी मिळणार हे महत्त्वाचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना सेंटर उभारली गेली. या सेंटरसाठी खासगी कंत्राटदारास चहा, नाश्ता, जेवण आणि पाणी देण्याचा ठेका देण्यात आला होता. कंत्राटदाराने लाखो रुपयांची पदरमोड करून सर्व साहित्यांचा पुरवठा केला. त्याचे बिलही जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. परंतु, अद्याप त्यांच्या हातात काही न आल्याने कंत्राटदारांमधून संताप व्यक्त होत आहे.

तर अधिकाऱ्यांकडून चालढकल सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदारांना पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. जीव धोक्यात घालून काम केलेल्या कोरोना योध्दांची अवहेलना सुरूच असून ती थांबविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना झाल्यावर घरातील लोक देखील हात लावायला घाबरतात. अशावेळी हेच कोरोना योध्दे रुग्णांची सेवा करून त्यांना नवसंजीवनी देत आहेत. पण सेंटर सुरू झाल्यापासून आजवर त्यांच्या हातात दमडीही द्यायचे औदार्य राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून दाखविले जात नाही.

गेले चार महिने अविरत सेवा करूनही उपासमारीची वेळ आली आहे. आता सणवार तोंडावर आले आहेत. आधीच उपासमारीची वेळ त्यात तोंडावर आलेला सण कसा साजरा करायचा ? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. एकीकडे जलद आणि कृतिशील काम करणारे मंत्री यात का लक्ष देत नाहीत ? असा प्रश्न पडला आहे. जर सेंटर चालवायला शासनाकडे पैसेच नव्हते. तर मग हे सेंटर का सुरू केले गेले? गरीब कोरोना योध्द्यांनी यंत्रणेवर विश्वास ठेऊन काम केले. पण आज त्यांचा विश्वासघात होत असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे.