कोल्हापुरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त…

0
160

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाची साथ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस दलातील २ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा शहरासह जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. आज (गुरुवार) सायंकाळी पाचपासून शहरातील प्रमुख चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक चौकांमध्ये वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

आजचा दिवस हा २०२० सालाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाला निरोप देऊन २०२१ सालाचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूर नगरी सज्ज झाली आहे. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी व हुल्लडबाजी होऊ नये यासाठी प्रशासनाने हा दिवस सध्या पद्धतीने सामाजिक अंतर ठेवून साजरा करावा असे आवाहन केलेले आहे. तरीही काही हुल्लडबाजी तरुणांकडून गैरवर्तणूक करतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर पोलीस दलाने शहराबरोबर ग्रामीण भागातील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.