कोल्हापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. सामान्य जनतेमध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, लहान मुलातील नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी ८ ऑक्टोबरला जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ‘दृष्टिची आशा’ असे घोषवाक्य केंद्र शासनामार्फत देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.

डॉ. माळी म्हणाले, वयस्कर नागरिकांमध्ये मोतिबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी आढळतो. ज्या रूग्णांना मधुमेहाचा आजार आहे, त्यांच्या दृष्टिपटलावर मधुमेहाचा परिणाम होतो. त्यांनी डायबेटिक रेटिनोपॅथीची आवश्यक तपासणी करून वेळीच उपचार केल्यास अंधत्व टाळता येते. राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर येथे मोफत तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. लहान मुलांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर वाढल्याने डोळा कोरडा होणे आणि दृष्टीदोष होणे याचे प्रमाण वाढत चालले आहे.

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसचा वापर वाढला आहे. त्यामुळे डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढत आहे. २० मिनीटे काम केल्यानंतर पापणीची उघडझाप करणे आवश्यक आहे. तसेच २० सेकंद डोळे बंद केल्यास डोळ्यात ओलावा निर्माण होतो. लहान मुलांमध्ये दृष्टीदोषाची तपासणी करून घेवून योग्य नंबरचा चष्मा वापरल्यास येणारे अंधत्व टाळता येते.