मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असे करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केले. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकासकामे केली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला आज (रविवार)  संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वत्र येणं जाणं सुरू झाले आहे. पण कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा, असे सांगत राहणं हे माझं कर्तव्य आहे. मार्चपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. पावसाळा व उन्हाळ्यात साथी पसरल्या नाहीत. पण, आता सर्व सुरू झाल्यानंतर थंडीतील आजार दिसू लागले आहेत. यावर मास्क लावणं, हात धुत राहणं आणि डिस्टन्स पाळणं, हा एकच उपाय करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.