‘सीपीआर’मध्ये महिन्यात तीन अतिगंभीर जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. वसंतराव देशमुख

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) मध्ये एका महिन्यात तीन अतिगंभीर जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना काळात बंद असलेले इतर विकारांवरील इतर उपचार सुरू झाल्यापासून महिन्यात ३५० तर कोव्हिड कालावधीत २७ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शल्यचिकित्सक शास्त्र विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

 देशमुख यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील २६ वर्षीय अतुल पटेल या रुग्णाचा सांगलीमध्ये अपघात होऊन मेंदू आणि पोटामध्ये रक्तस्राव झाला होता. तर डाव्या बाजूच्या किडनीला मोठा मार लागला होता. त्यामुळे किडनी काढण्यात आली. या रुग्णाला अतिशय गंभीर अवस्थेत सीपीआरमध्ये अॅडमीट करण्यात आले. त्यानंतर त्याच्या विविध तपासण्या आणि जोखमीच्या विविध शस्त्रक्रिया करून ५८ व्या दिवशी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील २४ दिवसाच्या बालकाला श्वास घेण्यास त्रास होत होता तर ते बालक रडत नव्हते. त्या बालकाला सीपीआरच्या नवजात शिशु विभागात दाखल केले असता त्याची आॅक्सीजन पातळी कमी असून धाप लागत असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याच्या फुफ्फुसामध्ये जन्मजात दोष होता. त्यामुळे त्याच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. रत्नागिरी येथील दीड महिन्याचा बालकाच्या डाव्या बाजूच्या छातीच्या पडद्यामध्ये जन्मजात छिद्र होते. तर जठराचा भाग छातीमध्ये सरकारला होता. त्यामुळे त्या मुलाला कफ, खोकला आणि धापेचा त्रास होत होता. या मुलावर सीपीआरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करून डिस्चार्ज देण्यात आला.  

यासाठी अधिष्ठाता डॉ. एस. एम. मोरे यांच्या मार्गदर्शन तर शिशु शल्यचिकित्सक डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, भूलतज्ञ डॉ. उल्हास मिसाळ,  डॉ. कौस्तुभ मे़च, डॉ. मधूर जोशी,  डॉ. सुप्रिया बागुल,  डॉ. सचिन पाटील, डॉ. मारुती पवार, डॉ. निलेश, डॉ. अनमोल यांचे बहुमोल सहकार्य लाभले.