कागल (प्रतिनिधी) : कागल शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा मिळालाच पाहिजे म्हणून संघर्ष करीत राहिलो. त्या भावनेतूनच तब्बल तीन हजारांहून अधिक घरे बांधून दिली. शहरातील गरजूंसाठी नगरपरिषदेच्या वतीने नव्याने आणखी तीन हजार घरे बांधणार, असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे जाहीर केले.

शहरातील श्री शाहूनगर वसाहतीमध्ये सात कोटींच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, गोरगरिबांच्या जीवनात चांगले दिवस यावेत या भूमिकेतून अखंड कार्यरत राहिलो. त्यातूनच वृद्ध आई-वडिलांना एकत्र श्रावणबाळ योजनेची पेन्शन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. अमूक घरात जन्मलो, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो, असे सांगणाऱ्यांचे दिवस कधीच निघून गेले आहेत. कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तरीही नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींनी सूर्याजी पिसाळ होऊन गद्दारी केली. अशा गद्दारांना खड्यासारखे बाजूला करावे.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, एकीकडे आमदार मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या सेवेचे पुण्याईचे मोठे काम केले. दुसऱ्या बाजूला समरजित घाटगे यांनी निराधारांच्या पेन्शन बंद करून त्यांच्या चुलीत पाणी ओतले. घाटगे हे सुडाचे राजकारण करीत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत हे चालू देणार नाही.

‘तर कागल सोडून जातो….’

गाडेकर म्हणाले, कोरोना काळात आमदार मुश्रीफ यांनी अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. समरजित घाटगे मात्र तब्बल दोन वर्षे कोरोनाला घाबरून बिळात लपून बसले होते. बेघरांना घरासाठी जागा दिली अशा वल्गना करणाऱ्या समरजित घाटगेनी एक गुंठा तरी दिल्याचे दाखवून द्यावे. कागल शहर सोडून जातो, असे आव्हानही गाडेकर यांनी दिले.

युवा कार्यकर्ते महेश गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना तीन हजार वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, नगरसेवक प्रवीण काळबर, उदय काटकर, राजू सातपुते यांचीही भाषणे झाली.

माजी नगराध्यक्ष नवल बोते, तात्यासाहेब पाटील, नितीन दिंडे, संजय चितारी, अण्णासाहेब पाटील, अर्जुन नाईक, नवाज मुश्रीफ, संदीप भोसले, ॲड. संग्राम गुरव, नूतन गाडेकर आदी उपस्थित होते. स्वागत राजू सातपुते यांनी, सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. अशोक रावण यांनी आभार मानले.