संदीप मागाडे खूनप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक

0
73

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूर (ता. हातकणंगले) येथे काही दिवसांपूर्वी राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खूनप्रकरणी आणखी तिघा संशयितांना आज (गुरुवार) शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश नामदेव वडर, मोहसीन इर्शाद सनदी व रमजान इर्शाद सनदी अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता ८ झाली असून अद्याप ग्रा. पं. सदस्य कुमार कांबळे याच्यासह काहीजण अद्याप फरारी आहेत.

कबनूर येथील मुजावर पट्टीत संदीप मागाडे याचा २३ जानेवारी रोजी रात्री राजकीय वैमनस्यातून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी कुणाल कांबळे याने शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर दोनच दिवसात पोलिसांनी मुदस्सर घुणके, राहुल शिंदे, रोहन कुरणे, शाहरूख शेख आणि शाहरुख अत्तार या पाचजणांना अटक केली होती. आज ऋषिकेश वडर, मोहसीन सनदी व रमजान सनदी या तिघांना कर्नाटकातील विजापूर येथून अटक करण्यात आली आहे.