सातारा (प्रतिनिधी) : साताऱ्या जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या  अफजल खानच्या कबरीजवळ  आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.

दरम्यान, इतिहास अभ्यासक द. बा. पारसनीस यांच्या १९१६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. त्यामुळे या तीन कबरी नक्की कोणाच्या हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  प्रतापगडावरील  अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम  प्रतापगडावरून हटवण्यात आले  आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा  मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली होती .  अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावे अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीने  सांगण्यात येत असल्याचा दावा करतही यावरुन अनेकदा वाद झाले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता.

२००६ सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणाला जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.  छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. अखेर शिवप्रताप दिनाचे  औचित्य साधत महसूल विभाग आणि वनविभागाकडून या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. परंतु त्या नंतर अफजल खानच्या कबरीजवळआणखी तीन कबरी आढळून आल्या असून. ह्या कबरी नक्की कोणाच्या प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.