कासारवाडी येथील बेकायदेशीर दगड उत्खननासाठी त्री-सदस्यीय चौकशी समिती…

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे  तब्बल पाचशे एकर वनजमिनीवर अनियंत्रित आणि बेकायदेशीर दगड उत्खनन सुरू आहे. १९५३ साली वन विभागाने संरक्षित वन म्हणून जाहीर झालेल्या जमिनीवर आणि कासारवाडी ग्रामपंचायतच्या गायरान जमिनीवर हजारो मेट्रिक टनाचा मुरूम व दगड उपसा अनेक वर्षापासून सुरू आहे. या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण येथे कासारवाडी ग्रामपंचायतीने पर्यावरणहित याचिका दाखल केली होती.

या याचिकेमध्ये कासारवाडी येथे हजारो ट्रक उपसा येथील दगडखणीमधून दररोज बेकायदेशीर जेसीबी लावून आणि ब्लास्टिंगद्वारे केला जातो. तरीही सगळ्या यंत्रणा झोपल्या आहेत का असा प्रश्न याचिकेत मांडला आहे. या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण येथे कासारवाडी ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी,मुख्य वनसंरक्षक अशी त्रिसदस्यीय चौकशी नियुक्त केली असून यासंदर्भात चौकशी अहवाल दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे सरपंच शोभाताई खोत यांनी सांगितले.

कासारवाडीतील गट क्रमांक ६३०/१-अ+ब ही जमीन बेकायदेशीर दगडखान चालविणाऱ्यांनी पूर्णपणे ताब्यात घेतली आहे. पर्यावरणाची कायमस्वरूपी हानी व निसर्गाची ओरबडणूक बंद व्हावी. कासारवाडी ग्रामस्थांना होणारा ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, सतत उडणाऱ्या धुळीमुळे होणारी शेतीची आणि पिकांची हानी, येथील लोकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचिकेतून मांडण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले.

यावेळी सरपंच शोभाताई खोत, ग्रा.पं. सदस्य मनीषा यादव, युवराज कदम, ग्रामस्थ उपस्थित होते.