कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका तरुणास शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबईतील दाम्पत्याने तीन लाख १ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अभिजीत राजाराम माने (वय ३४ रा. येळावी, जि. सांगली) सध्या  कोल्हापूर राहणार माने यांनी विजय बडे व त्याची पत्नी भाग्यश्री बडे (रा. नालासोपारा, मुंबई) या दोघांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंद केली आहे.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अभिजीत माने यांच्या मेव्हण्याला शासकीय नोकरी लावतो, असे सांगून मुंबईतील विजय बडे व त्याची पत्नी भाग्यश्री बडे या दोघांनी अभिजीत माने यांच्याकडून जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये वेळोवेळी तीन लाख 1 हजार रुपयांची रक्कम घेतली होती. मात्र, त्यांनी नोकरी लावण्याचे काम केले नाही. त्यामुळे माने यांनी बडे दाम्पत्यांना आपले पैसे परत द्या, अशी मागणी केली. बडे दाम्पत्याने पैसे परत दिले नाहीत. तसेच भाग्यश्री बडे हिने पैसे परत मागितले तर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकी अभिजित माने यांना दिली. त्यानंतर एक लाख ३२ हजारांचा धनादेश माने यांना दिला. मात्र, बडे यांच्या बॅक खात्यावर पैसे नसल्यामुळे तो धनादेश वटला नाही. त्यामुळे बडे दाम्पत्याने तीन लाख 1 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अभिजीत माने यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद केली आहे.