कोल्हापूर (प्रतिनिधी) : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन सख्ख्या भावांसह तिघा तरुणांना तीन वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. सौरभ संजय बोराटे (वय १९), विशाल संजय बोराटे (वय २०) आणि हृषीकेश संजय हजारे (वय २०, सर्व रा. व्हन्नूर, ता. कागल) अशी या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी १६ वर्षाच्या मुलीला आरोपी नोव्हेंबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शाळेच्या गेटपासून व्हरांड्यापर्यत पाठलाग करून अश्लील टिप्पणी, ओढणी ओढणे, गुलाबाचे फूल मागून मारणे,  नाव घेऊन पाठीमागून फिरणे असा त्रास दिला. याला कंटाळून मुलीने स्वतः कागल पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी या आरोपींना अटक करून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सरकारी वकील सौ. अमिता कुलकर्णी यांचा युक्तिवाद. साक्षीदारांचे जबाब ग्राह्य मानून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सदर आरोपींना न्या. ए. एस. महात्मे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.