कनाननगर येथील तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
45

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कनाननगर येथील एका तरूणाला भाई म्हणत नसल्याच्या कारणावरून तिघांनी काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. हा प्रकार सोमवारी रात्री ११.३० वाजता घडला. या प्रकऱणी पप्पू सावंत, सोनू सकटे, अफताब (सर्व रा. कनाननगर) या तिघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयूर प्रशांत गवळी (वय २४, रा. रमाई गल्ली, कनाननगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी रात्री कनाननगर, रमाई गल्ली येथे   फिर्यादी मयूर गवळी हे थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी सोनू सकटे आणि अफताब यांनी पप्पू सावंत यांनी तुला बोलावले आहे, असे सांगितले. त्यानंतर मयूर आपल्या मित्रासोबत सावंत यांच्या घराजवळ गेला. त्यावेळी तू मोठा आहेस की मी मोठा आहे, असे म्हणत तू मला भाई म्हटले पाहिजे. या कारणावरून सावंत यांने मयूरच्या डोक्यामागे काठीने प्रहार केला. तर सकटे आणि अफताब यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सावंत यांने तुला सोडणार नाही, अशीही धमकी दिली. दरम्यान, जखमी मयूरला सीपीआर रूग्णालयात दाखल केले आहे.