कोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक… 

0
1020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बागल चौक येथील जयराज पेट्रोल पंपा जवळ सापळा लावून करण्यात आली.

यामध्ये दौलत जोगम (वय३०, रा. कणेरकरनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ रा. गोतेवाडी, धामोड, ता.राधानगरी), प्रणव राजेंद्र खैरे,(वय २५. रा. मराठा बोडींर्ग हाऊस, दसरा चौक कोल्हापूर, मूळ रा. यल्लमा चौक,  इस्लामपूर, ता. वाळवा) आणि प्रकाश लक्ष्मण गोते (वय २५, रा. राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर, मूळ रा. गोतेवाडी, धामोड, ता. राधानगरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना कोल्हापूर जिल्हयामध्ये रेमडिसीवर इंजेक्शनचा साठा करुन काळया बाजारामध्ये २३ हजार रुपयांना एक इंजेक्शन अशी विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली होती. ते रेमडिसीवर इंजेक्शन बागल चौक येथील जयराज पंपावर घेऊन येत असल्याची माहिती गोपनिय सुत्रांनी सावंत यांना दिली होती. त्यानुसार   जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी शाखेकडील पथकासह तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडील औषध निरीक्षक अधिकारी यांच्यासमवेत सापळा लावला असता, बागल चौक परीसरातील जयराज पेट्रोलपंपाजवळ सापळा लावला.

यावेळी दौलत जोगम, प्रणव खैरे आणि प्रकाश गोते हे रेमडिसीवर सहीत सापडले. सचिन जोगम याच्याकडे एक रेमडेसिवीर औषधाची एक बाटली, प्रणव खैरे याच्याकडे दोन बाटल्या अशा एकूण तीन बाटल्या विक्री करण्यासाठी मिळून आल्या. त्यांच्याकडे ही औषध कोणाकडून प्राप्त केल्याबाबत चौकशी केली.

यावेळी सचिन जोगम हा मेडीकलमध्ये कामाला आहे. त्याचा मित्र प्रकाश गोते आणि प्रणव खैरे यांच्याकडून रेमडीसीवर औषधे विकत घेवून तो जास्त दराने विक्री करीत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनाला आले.

प्रणव खैरे हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असून तो शरण्या हॉस्पिटल, बेलबाग मंगळवारपेठ, कोल्हापूर येथे नोकरीला असून त्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार करतेवेळी शिल्लक राहीलेली रेमडेसिवीर औषधे ज्यादा दराने सचिन जोगम याला विकत होता. तसेच प्रकाश गोते हा वालावलकर हॉस्पिटल, उद्यमनगर येथे नोकरीला असून तो हॉस्पिटलमधून रेमडेसिवीर औषध उपलब्ध करुन ते सचिन जोगम याला विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सचिन जोगम हा युनिव्हर्सल मेडीकल, बागल चौक, कोल्हापूर येथे काम करीत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.