केंट क्लब रिसॉर्टमधील चोरीप्रकरणी तिघांना अटक  

0
251

टोप (प्रतिनिधी) : सादळे- मादळे (ता.करवीर) येथील केंट क्लब रिसॉर्टमध्ये झालेल्या चोरीचा छडा शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत लावून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर आरोपींनी अन्य ठिकाणाहून चोरी केलेल्या तीन गुन्हांची कबुली दिली असून यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी संकेत राजेंद्र वरगरे (वय२०, वर्षे रा. प्रगती कापड दुकानामागे, कोडोली ता. पन्हाळा), सत्यजीत राजेश पाटील (वय २२ वर्षे रा. मोरे कॉलनी, कोडोली ता. पन्हाळा), विरंजन संजय भुयेकर (वय२३, वर्षे रा. आझाद गल्ली, कोडोली ता.पन्हाळा) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

केंट क्लब रिसॉर्ट बंद असताना एअर कंडिशनर, जिमचे साहित्य आणि बोअरची मोटर असे ५१ हजाराचे साहित्य १२ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत चोरुन नेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाला सुरूवात केली होती. २६ नोव्हेंबररोजी शिये फाटा येथे रात्री १० वाजता संशयित वाहनांची तपासणी करताना एक ओमनी कार आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यामध्ये इलेक्ट्रीक मोटरसह साहित्य आढळून आले. त्याबाबत पोलिसांनी कारमधील आरोपींची चौकशी केली असता त्यांनी केंट क्लब मधून चोरी केल्याची कबुली दिली.  त्यानंतर पोलिसांनी ओमनी कार (एमएच०८ सी ५८११), स्प्लेंडर मोटरसायकल (  एमएच ०९ डीजी ९९२०), करिझ्मा मोटरसायकल (एमएच ०९ डीसी ६६५४)  क्लासिक बुलेट (एमएच ५० डी ७६७७),  स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच ११ एएफ ७८९) असा मिळून एकूण ३ लाख १६ हजार किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक किरण भोसले, पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, अविनाश पोवार, समीर मुल्ला, रविंद्र घोसाळकर, सतिश जंगम, महेश आंबी, प्रशांत काटकर, सचिन पाटील, निलेश कांबळे यांनी तपास केला.