जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, ‘राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत.
राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. त्याच धर्तीवर १८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्कराच्या छावणीत घुसून दहशतवाद्यांनी झोपलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केला होता. झोपलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात लष्कराचे १६ जवान शहीद झाले. त्याचवेळी लष्कराच्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. २० वर्षांतील भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता.