• उपजिल्हा रुग्णालयाचा गरोदर मातांना आधार
  • चार तालुक्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचा दुवा

पंढरपूर प्रतिनिधी :

पंढरपुरातील जिल्हा उपरुग्णालय सर्वसामान्य कुटुंबातील मातांसाठी वरदान ठरताना दिसत आहे.चालू २०२२-२३ या वर्षभरात या रुग्णालयात तब्बल ११८० बालकांचा जन्म झाला आहे तर गतवर्षी २०२१-२२ या वर्षात १३५२ बाळांचा जन्म इथे झाला आहे.चालू वर्षातील ७३९ बालके सिझेरियन द्वारे जन्माला आली असून ४४१ बालके सामान्य बाळंतपणाने जन्माला आली आहेत.

पंढरपूर तालुका हा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे तसेच सांगोला, मंगळवेढा, त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये काही सुविधा अपुऱ्या असल्याने या तीन तालुक्यातील अनेक रुग्ण पंढरपूरकडे धाव घेतात. या तालुक्यांबरोबरच पंढरपूर तालुक्यातील शेकडो रुग्ण आपल्या उपचारासाठी दररोज पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देतात.तसेच वारी काळातही लाखो भाविक या रुग्णालयातून उपचार घेतात. २४ तास मिळत असलेल्या अत्यावश्यक आरोग्य सेवांमुळे लाखो रुग्णांची गेल्या वर्षभरात सोय झालेली आहे. या उपजिल्हा रुग्णालयात सध्या १४० जणांची टीम कार्यरत असून यामध्ये १२ डॉक्टरांचा समावेश आहे.

अनेक सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आपल्या परिस्थितीमुळे खाजगी रुग्णालयातील बाळंतपणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे हे जिल्हा उपरुग्णालय सध्या अशा गोरगरीब तसेच गरजू कुटुंबासाठी वरदान ठरताना दिसून येत आहे. या सरकारी रुग्णालयात मिळत असलेल्या मोफत सुविधांमुळे एकवेळच्या बाळंतपणाचा कमीत कमी ४० ते ५० हजार रुपयांच्या खर्चाची बचत होत आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या तसेच नाजूक परिस्थिती असलेल्या शेकडो कुटुंबांना याचा आधार मिळत आहे.सोबतच डॉक्टर व येथील सहकारी स्टाफकडून मिळत असलेल्या चांगल्या सेवेमुळे व सहकार्याच्या भावनेमुळे या रुग्णालयाबद्दल असलेली नागरिकांची भावना आता चांगली होताना दिसून येत आहे.

सध्या या रुग्णालयातील बाळंतपणाच्या सुमारे साठ महिला एकाचवेळी उपचार व सेवा घेत आहेत. सोबतच आणखी बाळंतपणासाठी महिला आल्यास त्यासाठी वेगळी सोय असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तसेच बाळंतपणा दरम्यान बालकाला काही अडचण आल्यास अशा नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाची सोयही या ठिकाणी असून २२ मुलांसाठी अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. जिथे नवजात बालकांवर मोफत उपचार केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व अकलूजनंतर एकमेव पंढरपूर येथे ही सुविधा उपलब्ध आहे.सोबतच कुपोषित मुलांसाठी या रुग्णालयामार्फत एकावेळी वीस मुलांना मोफत उपचार करण्याची सोय आहे.सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयानंतर हे एकमेव सरकारी रुग्णालय आहे जिथे कुपोषित मुलांवर उपचार केले जातात. त्यामुळे सध्या तरी या रुग्णालयाचा सर्वसामान्य रुग्णांना फायदा होत असल्याचे चित्र आहे.

सर्वच आजाराच्या रुग्णांना मोफत व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.मोफत उपचाराबरोबरच सर्वच सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. विशेषतः गरोदर महिलांच्या उपचार व बाळंतपणाची सोय आपल्याकडे चांगल्या प्रकारे केली जाते.अनेक रुग्ण आपल्या नाजूक परिस्थितीमुळे गरोदरपणाच्या काळात आवश्यक असणाऱ्या सोनोग्राफी दीड दोन हजाराचा खर्च होईल म्हणून करण्याचे टाळतात.मात्र आपल्या रुग्णालयात मंगळवार,बुधवार व शुक्रवारी ही सोनोग्राफी मोफत केली जाते.त्यामुळे जास्तीत जास्त गरोदर महिलांनी याचा लाभ घ्यावा.

डॉ.महेशकुमार माने (एम.बी.बी. एस)
प्रभारी अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पंढरपूर