शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
122

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दात सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या,सर्वसामान्य माणसांचा ते बुलंद आवाज होते. देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते. असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, तालुकाप्रमुख उगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बालोद्यान अनाथ आश्रम येथे मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे गोरगरीब गरजू ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या अंगी परखड नेतृत्व आणि कणखर बाणा होता. या नेतृत्व कौशल्य गुणाने समाजासाठी जीव देणारे शिवसैनिक घडले. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण त्यांच्या या ब्रीद वाक्याने शिवसैनिकांना एक प्रकारची ऊर्जा मिळते. यापुढेही शिवसैनिक समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, उपशहर प्रमुख संतोष नरके, आप्पासाहेब भोसले उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे, सुहास पासोबा, बाबासाहेब गावडे, युवासेनेचे निलेश तवंदकर, नजीर मखमल्ला, शहर महिला वैशाली जुगळे आदी उपस्थित होते.