सातारा/मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो, तर बरं झाले असते, अशी भावना माझ्या मनात आली. त्यामुळे मी भावुक झालो होतो, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहासारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भावूक झाले होते. त्यावेळी उदयनराजे यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू पाहिल्याने अनेकजण हेलावून गेले. उदयनराजे का भावूक झाले असा अनेकांना प्रश्नही पडला. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

महापुरुषांचा अशाचप्रकारे अपमान सुरु राहिले तर भविष्यात काय होईल, ते मला माहिती नाही. आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत. असे अपमान सुरु राहिले तर हे प्रकार पुढे अंगवळणी पडतील, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

राज्यपाल शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. उद्या आणखी दुसऱ्या मोठ्या पदावरील व्यक्ती उठून शिवाजी महाराजांविषयी बोलेल. हे प्रकार खपवून घेतले तर उद्या अशा लोकांचे धाडस वाढेल. त्यामुळे माझा राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सवाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत राजकीय पक्षांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवाजी महाराजांच्या विचारांचे पालन करायचे नसेल तर राजकीय पक्षांनी त्यांचे नावही घेऊ नये, असा कठोर शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राजकारण्यांना फटकारले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिव सन्मानासाठी चलो रायगडची हाक दिली आहे. येत्या ३ तारखेला रायगडावर निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये बैठक पार पडली. यावेळी उदयनराजे यांनी त्यांच्या भावूक होण्याचे कारणही सांगितले. महापुरुषांचा अवमान होत राहिला तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात फक्त शिवाजी महाराज यांच्या विचाराने टिकली आहे. महाराजांनी सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला विरोध केला. वेगवेगळ्या पक्ष, संघटना, विचारवंत असे सर्वच जण प्रथम महाराजांचे नाव घेतात. त्यांच्या कार्याला महाराजांचेच विचार दिशा देतात. अशा महापुरुषांच्या विचारांची तोडमोड करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना कोणी दिले ? असा सवालही त्यांनी केला.

महाराजांच्या विचार प्रत्येकाने आपल्यापुरता आणि जातीपुरता घेतला. याचा परिणाम आज आपण एकमेकांकडे जातीपातीवरुन पाहात आहेत. लोक ज्या पद्धतीने बोलतात हे सर्व पाहून ज्या वेदना दुःख होते, ते कोणाला सांगावं? व्यथा मांडणयासारखा कोण आहे? सर्व वेदना दुःख रायगडच्या समाधीपुढे मांडण्यासाठी निर्धार सन्मानाचा विचार पुढे आला आहे. तेथे नतमस्तक होऊन हे दुःख आक्रोश मांडण्यासाठी रायगडावर जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.