टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथील काही विघ्नसंतोषी मंडळी गायरान जमीन उत्खनन प्रकरणावरून गेल्या सोमवारी झालेल्या वादाच्या घटनेचे भांडवल करून दोन समाजात तेढ निर्माण करू पाहत आहेत. याची चौकशी करावी अशा मागणीचे रीतसर पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे अविनाश कलगुटगी, प्रभाकर नलवडे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या पन्नास वर्षांपासून वडार समाज टोपमध्ये दगड उत्खनन करत असून कासारवाडी हद्दीत असणारे गायरान गट नं 630 वनविभागाच्या ताब्यात गेल्याने सध्या जागेअभावी व्यवसाय बंद पडून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्खन्नासाठी शासकीय जमीन उपलब्ध व्हावी अशी जिल्हाधिकारी, व महसूलमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी करणार करणार आहे. मागणी मान्य न झाल्यास प्रसंगी कुटुंबांसहीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

टोपमधील काही धनदांडग्यानी खाजगी जागेत महसूल यंत्रणेला हाताशी धरून तात्पुरता उत्खनन परवाना मिळवला आहे. त्यालगतच्या शासकीय जागेत बेसुमार अवैध उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडविला आहे. तरी संबंधितांकडून त्याची वसुली व्हावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे यावेळी सांगितले.

या पत्रकार बैठकीला माजी उपसरपंच बापू पोवार, वडार समाज संघटना अध्यक्ष रंगराव भोसले, अर्जुन पोवार, सतीश नलवडे, सुहास पोवार, सारंग नलवडे, सतीश चौगले, वडार समाजाते कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.