‘त्या’ रणरागिणींनी थांबवली ग्रामस्थांची पायपीट…

0
39

कळे (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील पाटेवाडी हे गाव डोंगर-दऱ्यात वसले आहे. तिथे दळणवळणाची समस्या त्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. गावात रेशन धान्य दुकान नसल्याने सुमारे ७ ते ८ किमी. अंतरावरील दुसऱ्या गावात रेशन आणायला जावे लागत असे. डोक्यावर धान्याचे पोते घेवून डोंगरातील पायवाट तुडवताना ग्रामस्थांची मोठी दमछाक व्हायची. विशेषतः वयोवृध्द महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसायला लागायचा. हीच अडचण लक्षात घेवून त्या रणरागिणींनी  गावातील महिलांना न्याय देण्याचा चंग बांधला. त्यांनी काळम्मादेवी महिला बचत गटाच्या माध्यमातून रेशनधान्य दुकानची गावातच सोय केली. त्यामुळे पाटेवाडी येथील स्वस्तधान्य दुकान लाभार्थ्यांना वरदान ठरत आहे.

शाहुवाडी तालुक्यातील पणुंद्दे ग्रामपंचायत अंतर्गत पाटेवाडी गावाचा समावेश होतो. हे गाव डोंगरदऱ्यात असल्याने निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. परंतु, हे गाव विकासकामांपासून कोसो दूर आहे. येथे दळणवळणाची कुठलीही सोय नाही. या गावातील लोकांना पणुंद्दे येथून रेशन आणायला जावे लागत असे. त्यांचा हा प्रवास सुमारे ७ ते ८ किमी. अंतराचा डोंगरातून होत होता. त्यामुळे संपूर्ण दिवस त्यात गेल्याने त्यांचा रोजगार बुडायचा. त्यामुळे गावातच रेशन दुकानची सोय व्हावी, अशी इथल्या ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यामुळे पाटेवाडी येथील काळाम्मादेवी महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियांका खोत आणि त्यांच्या सहकारी महिलांनी गावातच रेशनची सोय उपलब्ध केली.त्यामुळे लोकांची होणारी परवड कायमची थांबली. आता रेशन धान्य गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वस्तधान्य दुकान चांगल्या प्रकारे चालवत असल्याने अध्यक्षा प्रियांका खोत यांचे कौतुक होत आहे.

या दुकानात रेशनसाठी येणाऱ्या माळेवाडी, सुकाळमाळ आणि पाटेवाडी गावातील महिलांना दुकानात आल्यानंतर आपुलकीने चहापाणी केले जाते. तर गावातील लोकांची परवड थांबावी, त्यांची पायपीट थांबवावी. याच हेतुपोटी गावात रेशनधान्य दुकानाची महिला बचत गटामार्फत सुरवात  केली आहे. गरीबांना त्यांच्या हक्काचे धान्य देताना एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे बचतगटाच्या अध्यक्षा प्रियांका खोत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here