कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना ठाकरे सरकारकडून पैसे दिले जात नसल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. या आरोपाला राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदाचित त्या कारखानदारांना अमित शहा यांच्याकडून पैसे घ्यायचे असतील, म्हणूनच त्यांनी हा बेबनाव सुरु केला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावर मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले की, भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं. त्यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थकहमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपच्या एका तरी कारखानदाराने सांगावं की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत.

शहा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना    उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत अमित शहा यांनी आश्वासन दिलं ते खरं असावं. कारखानदारांच्या बाबतीत शहा इतकं धादांत खोटं बोलत असतील तर शिवसेना आणि भाजपमध्ये काय झालं असेल? त्याबाबतही शहा खोटंच बोलत असतील. शिवाय शहांना वाटलं नसेल की, शिवसेना कठोर होईल आणि युती तोडेल. त्यांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं वक्तव्य हे वैफल्यातून आलं आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.