गारगोटी (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर हिरे महाविद्यालय येथे शिकत असलेले विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेस पात्र आहेत. पण ज्यांचे सत्र ३, ४ व ५ या परीक्षेतील काही विषय अनुतीर्ण असतील, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयात पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी दिली. सदरची परीक्षा १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली आहे. 

प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रास पात्र आहेत. त्या विद्यार्थ्यांची भाग २ व ३ मधील सत्र ३, ४ व ५ ची पुर्नपरीक्षार्थी (बॅकलॉग) परीक्षा महाविद्यालय स्तरावर आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. कर्मवीर हिरे महाविद्यालयात नोंदणीकृत असलेल्या पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी असलेने या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. महाविद्यालयात बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बी. ए. बी. एड., बी. सी. ए. व एम. ए. या विद्याशाखांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. परीक्षा कालावधीत कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना महाविद्यालयाने केल्या आहेत. महाविद्यालयात आयोजित परीक्षेचे वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा’.