कागल (प्रतिनिधी) : शाहू कारखान्याने चालू गळीत हंगामात कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी उसाचे गाळप करून साखर उत्पादनाचे स्वतःचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे. सभासद ऊस पुरवठादार शेतकरी कामगार आणि हितचिंतक यांच्या पाठबळामुळेच हा सोनेरी दिवस उजाडला आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कारखाना कार्यस्थळावर साखर पोती पूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्पादित १० लाख २९ हजार १११ व्या पोत्याचे पूजन कारखान्याच्या संचालिका व शाहू ग्रूपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखाना मानधनधारक पैलवान अनिल चव्हाण, पॉवरलिफ्टर सोनल सावंत व इंद्रजीत फराकटे या खेळाडूंचा सत्कार केला.

घाटगे पुढे म्हणाले की, केवळ साखरेच्या उत्पादनावर न थांबता जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी कारखान्याच्या वाटचालीचा पुढील १० वर्षाचा रोडमॅप  आम्ही तयार केला आहे. त्यामध्ये गाळप क्षमता १० हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवणे, डिस्टिलरी  व इथेनॉल ६० हजार लिटरवरून दीड लाख लिटर पर्यंत विस्तारीकरण करणे, बायो सीएनजी व सीओटू प्रकल्प उभारणे आदींचा समावेश आहे.

यावेळी आय.डी. कुंभार (करड्याळ), शंकर मेथे (शेंडूर), महादेव तेलवेकर (पिंपळगाव), राजेंद्र कालेकर (कागल) या सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे देहाने जरी आज आपल्यामध्ये नसले, तरी विचारांनी ते येथेच आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणे मी कारखान्याचा चेअरमन म्हणून नव्हे तर तुम्हा सर्वांचा विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तुम्हा सर्व ज्येष्ठ सभासदांमध्ये मला स्व.राजेसाहेब दिसतात आणि तुम्हीच माझी ऊर्जा आहात. त्यांच्या या कृतज्ञतापुर्वक उदगारांमुळे स्व. राजे साहेब यांच्या आठवणीने सर्वांनाच गहिवरून आले.