कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात दिनदयाळ अंत्योदय राष्टीय नागरी उपजिविका अभियांनांतर्गत कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील बचत गटांनीही गरीब, गरजूंना मदत करुन सामाजिक कार्य केले आहे. मंगळवारपेठेतील मनमंदिर महिला बचतगटाने लॉकडाऊनमध्ये  अडकलेल्या गरजूंना जेवण, पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान आणि रिक्षाचालकांना मास्क दिले आहेत.

या बचतगटाच्या अध्यक्षा रुक्मीनी शिंदे यांनी गटातील सर्व सदस्य महिलांना एकत्र करुन कोरोना विरुध्दच्या लढाईत सक्रीय होण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना जेवण पुरविण्याचे काम मनमंदिर महिला बचत गटाने केले. याबरोबरच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची जाणीव-जागृतीवर या बचतगटाने भर देऊन आरोग्य शिक्षणाचं कामही केले.

महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस शेणीदान करण्याच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी केलेल्या आवाहनानुसार मनमंदिर महिला बचतगटाने पंचगंगा स्मशानभूमीस एक टेम्पो शेणीदान केल्या आहेत. तसेच मंगळवारपेठेतील सुमारे शंभर रिक्षाचालकांना मोफत मास्कही दिले आहेत.