टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळपाणी पुरवठा योजना शिरोली ग्रामपंचायतीकडे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आली. आमदार राजूबाबा आवळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावाला १९८४ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. राष्ट्रीय पेयजल योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील काम हे अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणी पुरवठा योजना शिरोली ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीने काही मागण्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केल्या होत्या.

त्यानुसार आज ही योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्यासाठी शासकीय विश्रामगृह इथं पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजीव आवळे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जी. डी. काटकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीत सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच उपसरपंच सुरेश यादव यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थांनी कोल्हापूर स्टील स्मशानभूमी ते गावठाण पाण्याच्या टाकीपर्यंत तीनशे एमएमची वितरण नलिका तातडीने टाकावी, जीवन प्राधिकरणाकडून रेडक्रॉसचे काम व्हावे,  थकीत पाणीपट्टीबाबत निर्णय व्हावा, योजना ताब्यात आल्यापासून वीजबिल भरण्याला परवानगी द्यावी, पाणी योजना सुरळीत सुरू होई पर्यंत किमान तीन ते सहा महिने जीवन प्राधिकरणाने सहकार्य करावे. अशा मागण्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केल्या.

यावेळी अमन मित्तल यांनी, ग्रामपंचायतीला ही योजना हस्तांतर  करताना पाणी पट्टीचा प्रश्न निर्माण होतोय. ८ लाख ६४ हजार रुपयांची पाणी पट्टी थकबाकी आहे. यावर निर्णय होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी थकीत विजबिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांशी चर्चांकरून फक्त मुद्दल भरण्याबाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. तसेच हातकणंगले गटविकास अधिकारी यांना योजनेतील शासकीय जागा दोन महिन्यांत हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही करावी व इतर मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं.

यानंतर ही पाणी योजना शिरोली ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. जीवन प्राधिकरनाचे कार्यकारी अभियंता जी डी काटकर सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांचेकडे पाणी योजना हस्तांतरित करण्यात आली.

यावेळी जि.प. कार्यकारी अभियंता मनिष पवार, जीवन प्राधिकरण उपअभियंता ए .डी. चौगुले,  ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, शाखा अभियंता व्ही. डी. चौगुले, अंकूश पवार, ए. एम. शेळके, महेश चव्हाण, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.