मुंबई (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात काढलेला ‘जीआर’ टास्क फोर्सने रद्द केला. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत ‘हे सरकार आहे की सर्कस’ अशी बोचरी टीका केली आहे. तसेच एक काय तो ठाम निर्णय घ्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी घोषणा केली होती. मात्र, बालरोग तज्‍ज्ञांच्‍या टास्क फोर्स बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध केला. टास्क फोर्सने शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने हा निर्णय रद्द करण्‍यात आला.तसेच राज्यात शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयात गडबड झाली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करताच हा निर्णय घेतला आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच पंधरा टक्के फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला आहे.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला ? हे कशासाठी. या सर्कशीतल्या कोलांटउड्यांना जनता त्रासून गेली आहे. एक काय तो ठाम निर्णय घ्या, अन्यथा जनतेचा उद्रेक होणार असल्याचे दरेकर यांनी ट्विट केले आहे.