पुद्दुचेरी (वृत्तसंस्था) : बंडखोर आमदारांमुळे पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. यावर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी संताप व्यक्त केला आहे. पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे, तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे, अशा शब्दांत नारायणसामी यांनी टीका केली आहे. बंडखोर आमदार संधीसाधू आहेत. आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल, असे नारायणसामी यांनी म्हटले आहे.  

नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी  आज (सोमवार) एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते.  नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला.