मुंबई (प्रतिनिधी) : पुढील वर्षाच्या सुरूवातीपासून चारचाकी वाहनांसाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एक परिपत्रक काढले असून १ जानेवारी २०२१ पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत. हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या आधी झालेली आहे, अशा वाहनांसाह एम व एन कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असेल.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार ‘फास्ट टॅग’ ला १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी केलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य केले होते. वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे ‘फास्ट टॅग’चा पुरवठा केला जात होता. तसेच फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल केवळ ट्रान्सपोर्ट वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावल्यानंतरच करण्याचे बंधनकारक केले होते. तर नॅशनल परमीट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ लावणे १ ऑक्टोबर २०१९ पासून बंधनकारक केले होते.