कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन आज कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रांगणात सकाळी ठीक ८:३० वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कुलगुरू डॉ. शिर्के व मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर युट्यूबद्वारे ऑनलाईन स्वरुपात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्वांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या सर्वच समाजघटकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘कोविड-१९चे धोके टाळण्यासाठी विद्यापीठाने साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांविना साजरा होणारा हा वर्धापन दिन वेगळा आहे. कोविड-१९ने आपल्यातल्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. विशेषतः ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत. या ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रणालीपासून सुटका होऊन प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेस लवकरात लवकर सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांबरहुकूमच आपल्याला टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवावयाची आहे. या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ व महाविद्यालये विविध उपक्रम घेऊन सामोरे येतील, ज्यायोगे शिकणे व शिकवणे अधिक सुलभ होईल’, अशी ग्वाही त्यांनी दिली.

– कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचे आवाहन

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..)

https://youtu.be/Rshs19TknV8

सदर कार्यक्रमानंतर शिवाजी विद्यापीठाच्या  ‘शिव वार्ता’ या युट्यूब चॅनलचे लोकार्पण कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते त्यांच्या दालनामध्ये करण्यात आले. वर्धापन दिन कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.आर. शेवाळे, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतरासह योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.