बारामती (प्रतिनिधी) : बारामतीच्या विकासात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांचे योगदान विसरता येणार नाही. राज्यामध्ये नेहमीच बारामतीच्या सर्वांगीण विकासाचे उदाहरण दिले जाते. परंतु इतिहासात पहिल्यांदाच बारामती नगरपालिकेवर काळे झेंडे फडकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.  

दिवाळीसाठी सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, या मागणीसाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी    गुरूवारपासून काम बंद आंदोलन केले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही या आंदोलनाची दखल न घेतल्याने आज (शुक्रवार) चक्क नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकावले. आणि जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेच्या इमारतीवर काळे झेंडे फडकावून लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला.