‘गोकुळ’चा तीस वर्षाचा हिशोब जनतेसमोर ठेवायला कधीही तयार : प्रतापसिंह पाटील-कावणेकर

0
2790

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  श्रीमती अंजना रेडेकर यांनी पत्रक काढून शौमिका महाडिक यांना प्रत्युत्तर दिल्याची बातमी वाचली. त्यांनी पत्रकात जुन्या गोष्टी काढल्या तर दमछाक होणार अशी वक्तव्ये केल्याचे समजते. तर रेडेकर यांना माझं आवर्जून सांगणं आहे की, तीस वर्षांचा हिशोब आपल्याकडे असेल तर जरूर काढा. त्या तीस वर्षातील प्रदीर्घ काळ चेअरमन असलेले दोन महारथी आज तुमच्याकडे आहेत. त्यांनासुद्धा आवर्जून हिशोब विचारा. आणि जर तुमच्यात तेवढं धाडस नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही व्यवस्थित सगळा हिशोब जनतेसमोर ठेवायला कधीही तयार असल्याचे प्रतापसिंह पाटील-कावणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, दोनच दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत संघात चालू असलेला तुघलकी कारभार जनतेसमोर मांडला. शौमिका महाडिक यांच्या आरोपांना तथ्यांच्या आधारावर खोडून काढणे शक्य नसल्यानेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी गेले दोन दिवस सत्ताधाऱ्यांकडून पत्रकबाजी सुरू आहे. यामध्ये शौमिका महाडिक यांनी पशुखाद्य वाहतुकीला गाड्या घेऊन संघाचं आर्थिक नुकसान केलं असा आरोप कोणीही केलेला नाही. पण त्या गाड्या घेताना सहकाराचे नियम का पाळले गेले नाहीत ? निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही ? एका ठराविक कंपनीलाच प्राथमिकता का दिली गेली ? त्याच कंपनीला काम देण्यात कोणाचा आर्थिक लाभ आहे ? हे प्रश्न आहेत. ज्याची उत्तरं देणं सत्ताधारी जाणूनबुजून टाळत आहेत. त्यामुळे आजपर्यंत महाडिकांच्या टँकरवर टीका करणाऱ्यांचा खरा चेहरा यानिमित्ताने उघडा पडला आहे.

कारण महाडिक वाहतूक कंपनीचे जितके टँकर संघाकडे दूध वाहतुकीला आहेत, ते रीतसर निविदा प्रक्रिया पूर्ण करूनच घेतलेले आहेत. जर तसं नसतं तर आता तुमच्या सत्तेच्या काळातही त्यांच्या कंपनीला काम मिळालंच नसतं, हे न कळण्याइतकी जिल्ह्यातील जनता दूधखुळी नाही. म्हणूनच ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ही म्हण या सत्ताधाऱ्यांसाठीच बनवली गेली आहे की काय, असा प्रश्न आज सर्व जनतेला पडला आहे.

तसेच गडमुडशिंगी आणि कागल येथील संस्थांचे संकलन राजकीय खुन्नस ठेऊन बंद केलं गेलं. संचालकांची शिफारस आणणे हा पायंडा मागील 30 वर्षे असला तरी कधी कोण्या संचालकांने याचा गैरवापर केलेलं जिल्ह्याने याआधी पाहिलं नाही. मुळात संघात राजकारण आणू नये, हेच तत्व ठेऊन आमच्या नेत्यांनी तीस वर्ष कारभार केल्यामुळे आज संघ पाच रुपयावरून पन्नास रुपयांपर्यंत पोचला, हे विसरू नये. मात्र, आता परिस्थिती तशी राहिली नाही, म्हणूनच तुम्हाला कायद्याचा आरसा दाखवायची वेळ आमच्यावर आलेली आहे.

प्रत्येक पत्रकात सत्ताधारी मंडळी म्हणत आहेत की, शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे आरोप केले. मग सत्ताधाऱ्यांनी पत्रक काढण्यापेक्षा शौमिका महाडिक यांनी मागितल्याप्रमाणे संपूर्ण माहिती कागदपत्रांसह त्यांना उपलब्ध करून का देत नाहीत ? एवढी धमक असेल आणि एवढेच हे धुतल्या तांदळाचे असतील तर पत्रकबाजी बंद करून सगळी कागदपत्र जनतेसमोर ठेवावीत. त्यांना कशाची एवढी भीती आहे ?

मला एवढंच सांगायचं आहे की, उगाच कोणीतरी लिहून देतं म्हणून पत्रक छापून देणाऱ्यांनी हा बालिशपणा इथेच थांबवावा आणि इथून पुढे स्वतःची उंची तपासून बोलावं. अन्यथा चेअरमन साहेबांनीही ध्यानात ठेवावं…’बात निकली है..तो दूर तलक जाएगी !’…असे पत्रकात म्हटेल आहे.