समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू

0
13

बुलडाणा (प्रतिनिधी) : लोखंडी सळ्या घेऊन जात असलेला टिप्पर उलटून झालेल्या भीषण अपघातात १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ घडला. तीन मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

समृद्धी  महामार्गाच्या कामावर दुसरबीड येथून मजूर घेऊन हा टिप्पर चालला होता. तडेगाव फाट्याजवळ समोरून एसटी बसच्या चालकानं भरधाव बस थेट टिप्परच्या दिशेनं घेतली. त्यामुळं नाइलाजाने ट्रक ड्रायव्हरला आपले वाहन रस्त्याच्या खाली घ्यावे लागले. पावसामुळे रोडच्या कडेला जमीन नरम झाल्यामुळे ट्रकचे टायर त्याठिकाणी दबले आणि ट्रक क्षणार्धात उलटला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमधील सळ्या मजुरांच्या शरीरात घुसल्या. त्यामुळे घटना स्थळी आठ मजुरांचा, तर इतर पाच जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

या अपघातात मरण पावलेले मजूर मध्य प्रदेश व बिहार या राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.