कोल्हापूरसह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ : लाखोंचा ऐवज लंपास  

0
43

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार घरफोड्या केल्या. सोन्याचांदीच्या दागिन्यांसह एलईडी टीव्ही असा मुद्देमाल लंपास केला. तर बाचणी (ता. करवीर) येथे वृद्धेच्या गळ्यातील ४ तोळ्याचे चिताक हिसकावून चोरट्याने पलायन केले. एकाच दिवशी चोरीच्या घटना घडल्याने शहर व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शहरातील संभाजीनगर परिसरात ओम गणेश कॉलनीमध्ये नवनीत आनंदा काशीद यांचे घर आज (बुधवार) पहाटे फोडून चोरट्यांनी अर्ध्या तोळ्याची चेन, १ तोळ्याचे वळे, लहान १५ अंगठ्या असा ऐवज चोरीला गेल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तर त्याच परिसरात उमेश खटावकर यांच्याही घरी चोरीचा प्रयत्न झाला. गजानन महाराज कॉलनीमध्ये सचिन सुभाष नडूले यांच्या घरातील टीव्ही चोरून नेला. तर कपाटही फोडण्यात आले. चोरट्यांनी शिवराज कॉलनी येथील रावसाहेब पाटील यांच्या घरातील कपाट फोडले. तर एक टीव्ही लंपास केला.

करवीर तालुक्यातील बाचणी येथे आज पहाटे ५.३० च्या सुमारास वृध्द महिला गोठ्याचे कुलूप काढत असताना मागून येऊन अज्ञाताने तिचे तोंड दाबून ४ तोळ्याचे चिताक हिसकावून पलायन केले. याबाबत भागीरथी दत्तात्रय पाटील (वय ६५ रा. बाचणी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.