कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात असणाऱ्या महाद्वार रोडवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी हात साफ करायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन महिलांना याचा फटका बसला आहे. या दोन्ही घटनेत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी महाद्वार रोडवर गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. ६ नोव्हेंबरला एका कपड्याच्या दुकानामध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची रोख रक्कम आणि दागिने असलेली सुमारे १ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी दिवसाढवळ्या लांबवली.  याप्रकरणी किरण प्रेमराज हेगडे (वय २६, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर ७ नोव्हेंबरला एका महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असा ९४ हजार रुपयांची पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी शर्वरी सुशांत कांबळे (वय २७, रा. यादवनगर रोड) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही घटनेत चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. याबाबतची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

एकूणच दिवाळाची काळात या शहरातील मुख्य महाद्वार रोडवरती घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.