दोन सराईत चोरट्यांना अटक : ५ लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोटारसायकल चोरून तिची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३० हजारांच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.

अवधूत लहू धुरे ( वय २०, रा. फये, ता.भुदरगड),  तुळशीदास अर्जुन पाटील (वय २१, रा.भेंडवडे ता.भुदरगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धुरे आणि पाटील चोरीची मोटारसायकल घेऊन कळंबा रोड, तपोवन शाळेच्या मागील मैदानात येणार असल्याची माहिती  पोलीस नाईक तुकाराम राजीगरे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, सदर ठिकाणी सोमवारी (दि.२६) पोलिसांनी सापळा लावला होता. दोघे जण नंबर प्लेट नसलेली चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन येथे आले. यावेळी त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता दोघांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन राजाराम पुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, भुदरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन व करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा १५ मोटर सायकली चोरल्याची कबुली दिली असून त्या सर्व मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने या दोघा चोरट्यांना २९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यराज घुले, पोलीस अंमलदार पांडूरंग पाटील, तुकाराम राजीगरे, विठ्ठल मणीकरे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव आदींनी केली.