मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करायला लावणाऱ्यांनी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, असा इशारा मुरगूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकाद्वारे दिला आहे. एकीकडे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या या तलावातून जनतेला पिण्यासाठी पाणी देत नाहीत आणि दुसरीकडे राधानगरी धरणाच्या भूमीत शाहू महाराज जयंती साजरी करण्याची भाषा बोलतात. ही दुटप्पी भूमिका का ? असा प्रश्न पत्रकाद्वारे विचारला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, राजर्षि शाहू महाराजांची जयंती दि. २६ जुन रोजी आहे. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले. यासाठी त्यांनी राधानगरी धरणाची पूर्तता केली. अशा महापुरुषाची जयंती काही लोक या धरणावर जाऊन साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या गोष्टीसाठी सर्व मुरगूडवासियांचा विरोध आहे.  कारण, शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशजांनी मुरगुडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी-पाणी करावयास लावले असून ही बाब शोभनीय नाही. छ. शाहू महाराज आणि श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी मुरगूड आणि परिसरातील लोकांच्या सहकार्याने तलाव बांधला.

हा तलाव मुरगूडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीच आहे. असे असताना शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आपल्या ऊसासाठी पाण्याचा प्रचंड वापर करून, जनतेला मात्र पिण्यासाठी पाणी न देता त्यांना दाहीदिशा करावयास लावत आहेत. म्हणून अशा व्यक्तींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीला राधानगरी धरणाची पवित्र भूमी कलंकित करू नये, असे पत्रकात म्हटले आहे.