पुणे (प्रतिनिधी) : भाजपकडून मला हल्ली बैठका आणि आंदोलनासाठी निरोप दिले जात नसल्याचे सांगत कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकांच्या बैठका होतात. त्याचाही निरोप दिला जात नाही. आजच्या आंदोलनाचाही मला निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे माझे पक्षाला काही प्रश्न आहेत, ते मी पक्ष पातळीवरच विचारेन, असे वक्तव्य त्यांनी केले.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर भाजपकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा विचार केलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्या मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही कानावर येत होत्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या एका खासगी चॅनेलशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, पक्षाने मला विधान परिषदेचा शब्द दिला होता. आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. या सर्व गोष्टी मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घातल्या आहेत. माझ्या मनात असलेले प्रश्न मी पक्षालाचा विचारेन. तसेच मी दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही.