जेवणातून गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आलेल्या ९ कलाकारांना लुटले

0
225

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लातूरहून देवीचा जागर घालण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या ९ कलाकारांच्या जेवणात गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार आज (बुधवार) सकाळी उघडकीस आला. शहरातील एका यात्री निवासमध्ये हा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील रायतेवाडी या गावातील कुंताबाई कवरे, द्रौपदी सूर्यवंशी यांच्यासह ९ कलाकार देवीच्या जागराच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात मंगळवारी आले होते. त्यासाठी त्यांना शहरातील एका व्यक्तीने काही रक्कम ऑनलाइन दिली होती. त्यानंतर सर्व कलाकार शहरात  आल्यानंतर  गंजी गल्ली येथील एका खासगी यात्री निवासमध्ये उतरले होते. यावेळी त्यांनी एका हॉटेलमधून जेवण मागवून रात्री तेथेच मुक्काम केला. दरम्यान, जेवणात अज्ञाताने गुंगीचे औषध घातल्याने सर्व जण बेशुद्ध पडले. रात्री त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटून नेले. हा प्रकार यात्री निवासचे मालक त्यांना सकाळी जागे करण्यासाठी गेले असता उघडकीस आला.