नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. परंतु केंद्राने याकडे लक्ष न देता आपला आठमुडीपणा कायम ठेवला आहे. यावर टीका करत मी मोदी सरकारला घाबरत नाही. हे लोक मला हात लावू शकत नाहीत. पण मला गोळी घालू शकतात, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) येथे केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राहुल गांधी मोदी सरकारवर जोरदार टीका करताना म्हणाले की, देशात आज चार-पाच लोकं मालक बनले आहेत. काही मूठभर लोकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा होत आहे. मोदी सरकारनं टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांची वाट लावण्यास घेतली आहे. ते केवळ तीन कायद्यांवर थांबणार नाहीत, तर शेतकऱ्यांची वाट लावूनच थांबणार आहेत. संपूर्ण देशाची शेती आपल्या तीन चार मित्रांच्या हवाली करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला.

मी या कायद्यांचा विरोध करून शेतकऱ्यांशी पाठीशी ठामपणे उभा राहीन. आता मी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरेच देणार नाही. ते काही माझे प्राध्यापक नाहीत. मी केवळ शेतकरी आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन, असे राहुल गांधी म्हणाले.