गोकुळ बिनविरोधाची बोलणी फिस्कटण्यास आहेत ‘ही’ कारणे…

0
1990

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ आघाडी बरोबर चर्चा करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यानुसार मुंबई आणि कोल्हापुरात बैठकाही झाल्या. पण चर्चेदरम्यान दोन्हीकडून एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आणि सत्तारुढ आघाडीची विरोधकाना नगण्य जागा देऊन बोळवण करण्याची मानसिकता यामुळेच बिनविरोधाची बोलणी फिस्कटली, असे विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल अशी शाश्वती कोणालाच नव्हती. तरीही मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एक औपचारिकता म्हणून चर्चेच्या फेऱ्या केल्या. त्याला सत्तारूढ आघाडीने तितकाच थंडा प्रतिसाद दिला. आणि अखेर बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव हवेतच विरला. याबाबत सत्तारुढ गटामार्फत आ. पी. एन. पाटील यांनी दिलेली वागणूक आणि चर्चेतील मुद्दे स्पष्ट झाले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवताना स्थानिक पातळीवर काही निर्णय होत असतात. चर्चेतून काही जमेल म्हणून प्रयत्न केले. महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी बरोबर यावे अशी आमची भूमिका होती. पण भाजपला बरोबर घेऊन आमच्या बरोबर युती करा असे कोणी म्हणत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. असे सांगताना त्यांचा रोख अर्थातच आमदार पी. एन. पाटील यांच्यावरच होता. याबरोबरच आता आम्हाला थांबून चालणार नाही म्हणून आम्ही निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर मुश्रीफ यांनी आमच्या बरोबर बोलणे सुरू असतानाच त्यांचे सुरू असलेले संपर्क दौरे आणि प्रचार यामुळे विश्वासाचे वातावरण राहिले नव्हते. तसेच सचिन वाझे प्रकरणात भाजप राज्य सरकारला टार्गेट करीत आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संतप्त आहेत, असे सांगत त्यांनी बिनविरोधाचा विषय संपवला.