महापालिका निवडणूक : महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच लढत…

0
183

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. नेतेही सक्रिय झाले आहेत. भाजपने निवडणुकीसाठीची टीम जाहीर केली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्त्वात भाजप कोल्हापूर मनपाची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असाच चुरशीचा आणि ईर्ष्येचा सामना रंगणार आहे.

मागील निवडणुकीत भाजपचा निसटता पराभव झाला. हे जिव्हारी लागल्याने तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध प्रयत्न करून सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही. म्हणून या वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करीत आहेत. यासाठी त्यांनी निवडणुकीतील यंत्रणा राबवण्यासाठी कारभाऱ्यांची निवड केली आहे. शिवाय निवडणुकीची सूत्रे महाडिकांकडे सोपवली आहेत. यामुळे महाडिकांचे राजकीय विरोधक सतेज पाटीलही ईर्ष्येने कामाला लागले आहेत. दोघांमध्ये आरोप, प्रत्यरोपांच्या फैरी झडत आहेत. परिणामी ही निवडणूक महाडिक विरूध्द सतेज पाटील अशीच प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही निवडणूक सतेज पाटलांसाठी विधान परिषदेच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जास्त जागा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसच्या तिन्ही आमदारांची मदत ते घेत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांची राजकीय कोंडी करण्याचा डाव विरोधी गोटातून सुरू आहे. त्यांच्यापासून राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मं!ी हसन मुश्रीफ लांब लावेत, असाही प्रयत्न होत आहे. पण सतेज पाटील सावधगिरीने पावले टाकताना दिसत आहेत.

कोल्हापूर महापालिका पक्षीय बलाबल – :

एकूण जागा – ८१

काँग्रेस – ३०, राष्ट्रवादी- १५, शिवसेना – ४, ताराराणी आघाडी – १९, भाजप- १३