यावर्षी पाणी टंचाई भासणार नाही : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
35

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असणाऱ्या  कडक उन्हाळ्यामुळे नद्यांमधील पाण्याची आवक कमी होते. तर उपशाचे प्रमाण अधिक असल्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची पात्रे कोरडी पडतात. परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी  आत्तापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करावे. असे आदेश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ना. यड्रावकर म्हणाले की, यावर्षी १४ ते १८ मार्चच्या दरम्यान वारणा धरणावरील विद्युत निर्मिती केंद्रात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी वारणा धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे वारणा नदी पात्र कोरडे पडले होते.  त्यामुळे अनेक गावातील नळपाणी पुरवठा योजना सुद्धा बंद होत्या. पाटबंधारे विभागाला केलेल्या सुचनेनंतर वारणा धरणांमधून १,५९२ क्युसेक्स क्षमतेने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळेच वारणा नदी काठावरील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. कृष्णा नदीवरील म्हैसाळ योजना सुरू असल्यामुळे कृष्णा नदीमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवणार होता.

त्यामुळे कोयना धरणामधून एप्रिल महिन्यापूर्वीच सांगलीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करून घेतला आहे. त्यामुळे कृष्णा काठावरील गावांना देखील या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. तसेच पाणी वापरावर नागरिकांनीच मर्यादा ठेवाव्यात, पाण्याची नासाडी टाळावी असे आवाहनही ना. यड्रावकर यांनी केले.