कोल्हापूर (प्रतिनिधी) : नाथाजी पोवार यांनी अभ्यासपूर्ण मांडणीमुळे हद्दवाढीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे अहवालानुसारच हद्दवाढ रद्द झाली. महापालिकेचा अहवाल बाजूला ठेवून त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही झाली. असा नि:स्वार्थी कार्यकर्ता कोल्हापूरने गमावला आहे, अशा शब्दांत माजी आमदार संपतबापू पवार – पाटील यांनी त्यांना आदरांजली वाहिली. नाथाजीराव दुलाजीराव पोवार यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (रविवार) शेकापच्या कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. नाथाजी पोवार यांनी आपण २०१४ साली ‘आप’तर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती त्या वेळी नाथाजीराव यांनी निवडणुकीत मदत केली व आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी समितीतून कशा प्रकारे आंदोलनात जनसेवा केली हे नारायण पोवार यांनी सांगितले.

कोल्हापूर युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे (कुफा) चे संस्थापक-अध्यक्ष अमरदीप कुंडले यांनी पोवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला. तसेच कुफा मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी पोवार यांच्या शिस्तबद्ध कामकाज पद्धतीविषयी माहिती देत त्यांनी पक्षासाठी स्थापनेपासून दिलेले योगदान सदैव लक्षात राहील असे सांगितले.

उद्योजक राजू माने, जे. एम. पाटील यांचीही भाषणे झाली. या वेळी ‘आप’चे जिल्हा सचिव जे. एम. पोवार, वाय. आर. निकम, सुरेश पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.